Ad will apear here
Next
अद्वितीय छंदवेडा संशोधक : अण्णा शिरगावकर


आज शिक्षक दिन आहे. तसेच, कोकणच्या इतिहासाचा ज्ञानकोश, असंख्य अभ्यासकांचे मार्गदर्शक असलेले अण्णा शिरगावकर पाच सप्टेंबर २०२० रोजी ९१व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. या औचित्याने अण्णांवर विशेष लेख!
....
कोकणच्या इतिहासाचा ज्ञानकोश, असंख्य अभ्यासकांचे मार्गदर्शक, अचूक टायमिंग साधणाऱ्या सहजस्फूर्त नर्मविनोदी शैलीतील लेखन-संवादासाठी प्रसिद्ध असलेले अण्णा शिरगावकर पाच सप्टेंबर २०२० रोजी ९१व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. करोना संक्रमण काळात बोलताना अनेकदा अण्णा व्यथित झालेले जाणवले. सतत माणसांत वावरलेल्या अण्णांना ‘लॉकडाउन’मधला एकटेपणा असह्य करून गेला. दोन दिवसांपूर्वी बोलताना म्हणाले, ‘काल... हे गेले....तेही गेले. आमच्या वयाची बरीच माणसं जात आहेत. वाईट वाटतं. आता शुभेच्छांनी काय करायचं आहे ?’ आपल्या या बोलण्याला मध्येच ब्रेक देऊन अचानक त्यांनी ‘करोनामुळे वेळ वाया जातो आहे,’ या पूर्वीच्या अनेक संवादांतील विधानाला पूरक असलेलं, ‘कामे पडली अनंत । वेळ मात्र मर्यादित ।। म्हणुनी व्यर्थ गप्पात । कालक्षेप न की जे ।।’ हे वचन ऐकवलं. तेव्हा त्यांच्या याही वयातील वैचारिक सक्रियतेचा हेवा वाटला. त्याच जाणिवेतून लिहिलेलं अण्णांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारं हे ‘शब्दपूजन!’

दोन वर्षांपूर्वी, अण्णांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे जगप्रसिद्ध दाभोळमधील आपल्या ६० वर्षांच्या वास्तव्याला पूर्णविराम दिला. त्यांनी आपला मुक्काम नोव्हेंबर २०१८पासून चिपळूण तालुक्यातील शिरगाव येथे आपल्या कन्येकडे हलविला. १९६०मध्ये ते दाभोळला वास्तव्यास आलेले. दाभोळमधील सहा दशकांत त्यांनी कोकणच्या इतिहासाला अनेक नवे संदर्भ उपलब्ध करून दिले. एखाद्या छोट्याशा ओहळामधील माशाला नदीचा पत्ता गवसावा, तसे काहीसे विसापूरहून दाभोळला आलेल्या अण्णांचे त्या काळी झाले. कारण दाभोळ ही प्राचीन नगरी ‘दालभ्यपुरी’ होती. दाभोळच्या डोंगरावरून दिसणारा बंदराचा नजराणा, धक्क्यावरील आदिलशहाच्या बीबीची अर्थात माँसाहेबांची मशीद, अंजनवेल येथील गोपाळगड किल्ला, तांबड्या रंगाच्या मंगलोरी कौलांची घरं, खाडीपासून समुद्रापर्यंत पसरलेले माडांचे बन हा सारा नजराणा आणि त्यातच दाभोळ बंदरातून पैलतीरी वेलदूरला जाणारे मचवे, लाँचेस, होड्या आणि डुगडुग्या या साऱ्यांचे नजरेत सामावणारे चित्र पाहण्याचा योग दाभोळच्या डोंगरावर जुळायचा. याच वातावरणात अण्णांच्या संशोधन आणि संग्राहक वृत्तीला खतपाणी मिळाले. दाभोळच्या खाडीला येऊन मिळालेल्या वाशिष्ठीच्या दोन्ही तीरांवरील सांस्कृतिक, सार्वजनिक आयुष्यात अण्णा आयुष्यभर वावरले. गेली ७५हून अधिक वर्षे डायरीलेखन करीत राहिले. बेताची आर्थिक परिस्थिती असूनही त्यांनी आयुष्यात असंख्य छंद जोपासले. अपरान्ताच्या साधनांसाठी ५०हून अधिक वर्षे डहाणूपासून कारवारपर्यंत धावपळ केली. दुर्मीळ वस्तूंचा संग्रह केला. वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन, वागण्यातील वक्तशीरपणा हे त्यांच्या कार्यपद्धतीतील आवर्जून दखल घेण्याजोगे गुण! ‘छंदी व्हा!’ हा विषय घेऊन लायन्स आणि रोटरी क्लबच्या माध्यमातून विविध शाळा, महाविद्यालयांतून अण्णा महाराष्ट्रभर फिरले. त्यातून असंख्य संग्राहक, अभ्यासकांनी प्रेरणा घेऊन आपल्या आयुष्याला छंदांची सुगंधी किनार प्राप्त करून दिली.

एकविसाव्या शतकात, कोकणला आठ हजार वर्षांपूर्वीचा प्राचीन इतिहास असल्याचे पुरावे उपलब्ध होत असताना काही दशकांपूर्वी, ‘कोकणला प्राचीन इतिहास नाही’ हे शासकीय तज्ज्ञांचे म्हणणे नऊ ताम्रपटांचा शोध घेणाऱ्या अण्णांनी आपल्या मेहनतीने खोडून काढले. कोकणचा स्वाभिमान जागवत, इतिहासाला कलाटणी देण्याचे काम केले. सतत धडपडणाऱ्या माणसाचे आयुष्य जगत शिक्षणाचा अगर वडिलोपार्जित कर्तृत्वाचा वारसा नसताना आपल्या अभ्यासू वृत्तीने ते कोकण इतिहास संशोधनाच्या माध्यमातून जगभर पोहोचले. आजही कै. सौ. नंदिनीकाकींच्या पश्चात वयोमानानुसार थकलेले अण्णा उपलब्ध वेळेत समाजाला ‘अधिकचे काही देता येईल का?’ याच्याच विचारात असलेले अनेकांनी पाहिलेत. खरं तर सच्च्या इतिहासकाराबरोबर गप्पा मारण्याचा आनंद काही वेगळाच असतो. हे इतिहासकार फक्त अस्सल पुराव्यांच्या आधाराने बोलतात. मूळ नकाशे, आकडेवारी यांची सोबत आपल्या बोलण्यात घेतात. विषयाच्या अभ्यासातील अपुऱ्या जागा वास्तववादी तर्क लावून भरून काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात. कधी-कधी बखरीचाही आधार घेतात. भूतकाळाचे आकर्षक किंवा भावनोत्कट चित्र रंगवत नाहीत. अशा संवादातून माणसाची भूतकाळाबाबतची जाण वाढते. भूतकाळ साक्षात जिवंत करून त्याची वर्तमानाशी सांगड घालीत भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न असे इतिहासकार करतात. आदरणीय अण्णा आम्हाला अशा पठडीतील वरच्या श्रेणीचे वाटतात. 

अण्णांनी आपल्या आयुष्यात शिक्षण, सहकार, कामगार, ग्रामीण विकास, वाचन संस्कृती, अपंग संस्था, पंचायतराज, संग्रहालयशास्त्र आणि कोकणच्या प्राचीन इतिहासाचा शोध या विषयात मैलाचा दगड ठरणारे कार्य उभे करून ठेवले. राजकारणासारख्या विषयात माणूस एकदा अडकला की प्रसिद्धीचे वलय, कार्यकर्त्यांचा गोतावळा या साऱ्यातून दूर जाणे अवघड असते. अण्णांनी वयाच्या पन्नाशीनंतर जाणीवपूर्वक राजकारणातून समाजकारणात स्वतःला वाहून घेतले. आपल्या कामाला योग्य दिशा मिळावी म्हणून सन१९८३ मध्ये त्यांनी ‘सागरपुत्र विद्या विकास संस्था’ स्थापन केली. सारा अपरान्त पायी तुडवून इतिहासाची अनेक साधने गोळा केली. ताम्रपट, लहान-मोठ्या तोफा, जुनी कागदपत्रे, पोथ्या, शिलालेख, तलवारी, बंदुका, खंजीर, जुनी नाणी, अनेक लहान-मोठ्या मूर्ती, सनदा, जुनी नक्षीदार भांडी आदि वस्तूंचा या साधनांमध्ये समावेश होता. त्या काळी दाभोळसारख्या फारशा सोयीसुविधा नसलेल्या गावातून एखाद्या छंदामागे बेभान धावत आपले कार्य सिद्धीस नेणे ही मोठी गोष्ट आहे. इतिहास हा कधीच कल्पित नसतो. तो कागदपत्रांवर आणि पुराव्यांवर आधारित असतो, हे अण्णांनी खूप अगोदरच निश्चित केल्याचे त्यांचा संग्रह अभ्यासल्यावर लक्षात येते. म्हणूनच अनेक अभ्यासकांना हृदयाला जागे करणारा स्वच्छ प्रकाश त्यांच्या मार्गदर्शनातून प्राप्त झाला आहे.

अण्णांच्या संशोधन कार्याने प्रेरित होऊन इतिहासाचे अनेक अभ्यासक दूरदूरहून आज शिरगावलाही येतात. अण्णा कोणालाही इतिहासात रमून जायला सांगत नाहीत. ‘इतिहासातून शिकण्यासारखे बरेच काही आहे,’ हे त्यांचे सांगणे असते. गेल्या वर्षी त्यांनी, ‘एखाद्या गावाकडे पाहण्याची संशोधकदृष्टी किती चिकित्सक असू शकते याचा आदर्श वस्तुपाठ घालून देणारा दाभोळमधील ६० वर्षांच्या वास्तव्याचा आलेख प्रकाशित केला. एखाद्या गावाची तटस्थपणे चिकित्सा करताना किती संदर्भ विचारात घेता येतात, याचीही जाणीव व्हावी. आयुष्याच्या अगदी सुरुवातीला ‘आपल्याला नक्की काय हवंय?’ याचं मर्म उमजल्याने आयुष्याचा प्राधान्यक्रम निश्चित करून टाकीत जगाने ठरवून दिलेल्या चाकोरीबद्ध मार्गावरून मार्गक्रमण करण्यापेक्षा स्वतःला आनंद देणाऱ्या निरुपद्रवी छंदांसोबत आयुष्य जगलेल्या अण्णांनी १४ पुस्तकांचे लेखनही केले आहे. पायाच इतिहासाचा असल्याने त्यांच्या लेखनात व्यापक संदर्भ, तत्त्वज्ञान, सखोल चिंतन, सूक्ष्म विश्लेषण भेटते. ९१व्या वर्षात पदार्पण करत असल्याच्या निमित्ताने अण्णांमधील अद्वितीय छंदवेड्या संशोधकाला मनःपूर्वक दंडवत!

- धीरज वाटेकर, चिपळूण, जि. रत्नागिरी
ई-मेल : dheerajwatekar@gmail.com
मोबाइल : ९८६०३ ६०९४८

(लेखक ‘पर्यटन आणि चरित्र लेखन’ या विषयावरील आठ पुस्तकांचे लेखक असून, कोकण इतिहास, ग्रंथ चळवळ, पर्यटन, पर्यावरण, सामाजिक जागृतीपर विषयात गेली २३ वर्षे कार्यरत असलेले पत्रकार आहेत.)


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GXDOCQ
Similar Posts
चिपळूणचे वैभवशाली वस्तुसंग्रहालय चिपळूणच्या तब्बल १५५ वर्षे जुन्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराने आपले वस्तुसंग्रहालय अलीकडेच खुले केले आहे. चिपळुणातील हे संग्रहालय कोकणाच्या सांस्कृतिक राजधानीचे वैभव ठरते आहे. भारतीय मातीतील दोन लाख वर्षांपूर्वीच्या मानवी वापरातील पुराश्मयुगीन हत्यारांपासून कोकणी वापरातील गेल्या दोन-पाचशे वर्षांतील
‘तांबट’ पक्ष्याचा फराळ! घराच्या आवारातल्या उंबराच्या झाडावर फळांचा आस्वाद घेणाऱ्या तांबट पक्ष्याच्या जोडीचे अचानक दर्शन झाल्यावर आलेल्या सुखद पर्यावरणीय अनुभूतीचे धीरज वाटेकर यांनी केलेले हे वर्णन...
बाळासाहेब : एक लेणे...! शिवसेनेचे संस्थापक आणि प्रसिद्ध व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांचा २३ जानेवारी हा जन्मदिन. ज्येष्ठ संपादक भारतकुमार राऊत यांनी जागवलेल्या त्यांच्याबद्दलच्या या आठवणी...
शिवपत्नी महाराणी सईबाई पाच सप्टेंबर १६५९ रोजी आपल्या लाडक्या शंभूराजांना, छत्रपती शिवाजी महाराजांना व सर्व रयतेला सोडून सईबाई राणीसाहेब वयाच्या अवघ्या २६व्या वर्षी निजधामाला गेल्या. आज त्यांचा स्मृतिदिन.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language